महाराष्ट्र प्रिमियर लीगची धमाकेदार सुरुवात
Ashwin Jangam
June 16, 2023
महाराष्ट्र प्रीमियर लीग ची आज धूमधडाक्यात सुरुवात. 10 वर्षानंतर पुन्हा होणाऱ्या या लीग च्या पहिल्याच सामन्याला पाहायला प्रेक्षकांनी तुफान गर्दी गेली होती. उद्घाटन समारंभ प्रसंगी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या दिमाखदार उद्घाटन सोहोळ्या निमित्त महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे मैदानाचे सौंदर्य खुलून दिसत होते.
उद्घाटन प्रसंगी मैदानावर आकाशात आतिशबाजी पाहायला मिळाली, तर सामना सुरु झाल्यावर मराठी धुरंधरांच्या चौकार षटकारांच्या रूपाने अतिषबाजी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. पुणेरी बाप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स मध्ये झालेल्या सामन्याने या लीग ची सुरुवात झाली, आणि ऋतुराज गायकवाड च्या नेतृत्वाखाली पुणेरी बाप्पा संघाने या सामन्यात विजय मिळवला.
तत्पूर्वी , टॉस जिंकत पुणेरी बाप्पा ने गोलंदाजी चा निर्णय घेतला, आणि त्यांच्या गोलंदाजांनी तो निर्णय सार्थ ठरवला. चांगली सलामी भागीदारी झाल्यानंतर रोहन दामले याने केदार जाधवचा बळी घेऊन पुणेरी बाप्पाला पाहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर पियूष साळवी आणि सचिन भोसले यांनी वेळोवेळी संघाला बळी मिळून देत प्रत्येकी 3 बळी घेतले. कोल्हापूर टस्कर्स कदम खेळताना महाराष्ट्र संघाचा सीनिअर अंकित बावणे याने एकहाती फटकेबाजी करत संघाला 144 धावांपर्यंत नेलं. त्यात 72 धावांचे मोलाचे योगदान देत एमपीएल मधले पहिले अर्धशतक त्याने आपल्या नावावर केले.
दिलेल्या लक्ष्य चा पाठलाग करताना, कर्णधार ऋतुराज गायकवाडने आक्रमक फलंदाजी करत तेजतर्रार अर्धशतक केले. त्याला सलामी फलंदाज पवन शाह याने साथ दिली. दोघांनी 10 षटकात 110 धावांची भागीदारी केली. ऋतुराज 27 चेंडूत 64 धावा करून झेलबाद झाल्यावर पवन आणि सूरज शिंदे यांनी आक्रमण सुरूच ठेवले. आणि 15 व्या षटकात 8 गडी राखून पुणेरी बाप्पाने लक्ष्य पूर्ण केले.
फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर पुढे राहत पुणेरी बाप्पा ने पहिला सामना आपल्या नावावर केला. लाडक्या ऋतुराज गायकवाडला त्याची लयीत खेळताना पाहून प्रेक्षकांना समाधान मिळालं. यासोबतच अनेक नवख्या खेळाडूंची नावं क्रिकेट रसिकांना माहीत झाली. या एका सामन्यात खेळणारे युवा मराठी क्रिकेटपटू पाहून सर्वांनाच येणाऱ्या सामन्यात आणखीन असे अनेक भारताचे भविष्यातील तारे पाहण्याची उत्सुकता लागली आहे.