महाराष्ट्र प्रीमियर लीग : एक सुरुवात
Ashwin Jangam
June 15, 2023
18 एप्रिल 2008 रोजी , IPL, अर्थात इंडियन प्रीमियर लीग चा पहिला सामना खेळला गेला. आणि बघता बघता आयपीएल ने देशाचाच नव्हे तर संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. याच आयपीएल मुळे बीसीसीआय वर लक्ष्मी ची प्रसन्न झाली आणि बीसीसीआय जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बनला.
यामुळे बोर्ड आणि सर्व पदाधिकारी एकीकडे खूप खुश होते, तर दुसरीकडे एक वेगळं काहीतरी पाहता येतंय म्हणून प्रेक्षक ही या भव्य लीग ला पसंत करू लागले होते. एक म्हणजे उत्कृष्ठ दर्जाचं क्रिकेट त्यांना पाहायला मिळत होतं, आणि त्यासोबतच अनेक भारतीय तरुण खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळत होती. यामुळेच पहिल्या सीझन मध्ये ग्रॅम स्मिथ सोबत सलामीला येणारा स्वप्नील अस्नोडकर ही सर्वांच्या मनात राहिला.
एकंदरीत काय, तर आयपीएल ने सर्वांनाच भुरळ घातली, आणि , ही लीग अतिशय यशस्वी झाली. आणि याच आयपीएल च्या धर्तीवर अनेक राज्यस्तरीय असोसिएशन ने आपल्या राज्यासाठी एक लीग सुरू केली. तामिळनाडू प्रीमियर लीग, कर्नाटक प्रीमियर लीग ही याची काही उदाहरणं. त्याच बरोबर मुंबई क्रिकेट असोसिएशन ने मुंबई क्रिकेट लीग सुरू करून मुंबईतल्या अनेक युवा खेळाडूंना संधी दिली. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ने महाराष्ट्र प्रीमियर लीग सुरू करण्याचा निर्णय गेल्या महिन्यात घेतला.
एमसीए चे अध्यक्ष माननीय श्री रोहित पवार यांनी आयपीएल सुरू असताना एमपीएल ची घोषणा केली. आणि आज, दिनांक 15 जून 2023 रोजी या लीग चा शुभारंभ होणार आहे. एमसीए च्या अखत्यारीत येणारा प्रदेश, अर्थात, विदर्भ आणि मुंबई , ठाणे, पालघर जिल्हे व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्र मधल्या युवा खेळाडूंसाठी ही एक पर्वणीच आहे.
या स्पर्धेसाठी पुणे, रत्नागिरी , कोल्हापूर, सोलापूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर हे 6 संघ निवडण्यात आले आहेत. भारताचा युवा स्टार ऋतुराज गायकवाड पुणे संघाचे नेतृत्व करणार आहे. यातोबताच भारतासाठी खेळलेले केदार जाधव, राहुल त्रिपाठी हे देखील या स्पर्धेत खेळताना दिसतील. त्या व्यतिरिक्त राजवर्धन हांगर्गेकर, विकी ओस्तवाल, अंकित बावणे ,सत्यजीत बछाव, यश क्षीरसागर, असीम काझी, नौशाद शेख यांसारखे अनेक खेळाडू आपल्याला या लीग मध्ये दिसणार आहेत. यात एकूण 18 सामने होणार आहेत, आणि त्याच बरोबर 3 महिलांचे एक्जीबिशन सामने ही आयोजित करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात अनेक खेळाडू असे आहेत की ज्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता असूनही त्यांना आपली क्षमता दाखण्याची संधी कधीच मिळाली नाही. या सर्वांसाठी हे एक सुवर्णसंधी आहे. यासोबतच अनेक प्रेक्षकांनाही आपल्या प्रांतातील दर्जेदार खेळाडूंची माहिती होण्यास मदत या स्पर्धेमुळे मिळेल. यासोबत, संघांसोबत जोडल्या गेलेल्या मराठी उद्योगपती यांच्यासाठी ही एक पर्वणी आहे महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचण्याची.
एकूणच काय , तर महाराष्ट्र प्रीमियर लीग सुरू करण्याचा हा निर्णय स्वागतार्ह आणि अतिशय कौतुकास्पद आहे. आणि अगदी खेळाडूंपासून ते क्रिकेट रसिकांपर्यंत, सर्वांना सुखावणारा हा निर्णय आहे. आणि हे एक महत्त्वाचं पाऊल आहे महाराष्ट्र राज्यातील क्रिकेट ला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा. रसिकांना विनंती की या लीग मध्ये होणारा सामना नक्की पाहा आणि आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन द्या. ही लीग यशस्वी होवो हीच आशा .
सामन्याचे ठिकाण :- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे स्टेडियम, गहुंजे, पुणे
प्रक्षेपण :- DD स्पोर्ट्स
कालावधी :- 15 जून ते 29 जून
तिकीट :- मोफत
Video:- Watch Here